Crop Loan छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी अनेक शेतकरी पात्र असूनही त्यांना अद्याप तांत्रिक त्रुटींमुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत. यामध्ये सहकारी संस्थांचे सभासद व राष्ट्रीयकृत बँकांचे लाभार्थी असलेले शेतकरी जास्त आहेत.
कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकरी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची अशी स्थिती असल्याने म्हणजेच त्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप न मिळाल्याने विविध कार्यकारी संस्था अवसायनात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या काळात दीड लाख रुपयांची कर्जमाफी व 25 हजार रुपये बँक खात्यात जमा करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणारी शेतकरी कर्जमाफी योजना घोषित झाली होती.
यानंतर सत्तांतर होऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी आत्मसन्मान योजना अमलात आणून दोन लाख रुपयांची थकीत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रु. अदा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या दोन्ही योजनांच्या लाभापासून अजूनही राज्यातील लाखो शेतकरी वंचित असल्याची स्थिती आहे.
या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दि. १-४-२०१५ ते ३१-३-२०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्प मुदत पीक कर्जाची दि.३०-९-२०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांचे अल्प / अत्यल्प भूधारक याप्रकारे जमील धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात रु. 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत दि. १-४-२०१५ ते ३१-३-२०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, पुनर्गठन / फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एका पेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दि. ३०-०९-२०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम रु. 2 लाखांपर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
कर्जमाफी योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले तसेच राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँकांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठीत / फेर पुनर्गठीत कर्ज हे कर्ज माफ केले जाते.